चित्रपटातील रंग आणि रंगभुमीवरचे रंग खूप वेगळे असतात. पडद्यावरील त्या रंगांना सीमा नसते. कृत्रिम, लोभसवाणे, चमचमणारे असे ते वाटतात. रंगभुमीवर तेच रंग जिवंत व खूप बोलके भासतात.पण, रंगभुमीच्या पार्श्वभुमीवर एखादा चित्रपट निघाला तर? अहो, दुधात साखरच म्हणा हवं तर. 'नटरंग' म्हणूनच ह्रदय-स्पर्शी कलाकृती वाटते.
गुणा (अतुल कुलकर्णी) भारदस्त शरिरयष्टीचा शेतकरी दाखवला आहे. स्वत्तः मधला प्रचंड रसिक, शेतीतील निराशा व मित्रांची संगत त्याला 'तमाशाचा फड' उभा करायला भाग पाडते.तमाशात 'बाई नाही, तर काही नाही' हे पटल्यावर अभिनेत्री सोनालीचा प्रवेश होतो.'कलाकराने कोणत्याही भुमिकेबद्दल कमीपणा मानू नये', हे उमजल्यावर तो 'नाच्या'ची भूमिका करण्यासाठी अक्षरशः कंबर कसतो.
चित्रपटाच्या मध्यांतरानंतर अतुलला पाहून तोंडाचा 'आ' वासतो. तब्बल १५ किलो वजन कमी केलेला, केस वाढवलेले, भुवया कोरलेल्या,चाल बदललेली! शृंगार करून तो रंगभुमीवर कंबर लचकवत, नाक मुरडत,दातात ओठ धरत प्रवेश करतो; तेव्हा आपल्या डोळ्यांच्या पापण्या लवतच नाहीत.
त्यानंतर त्याच्या कामगिरीला मिळणारी वाहवा जितकी आनंददायी, तितकेच त्याची वैय्यक्तीक जीवन चरित्र विषद रंग भरत जाते.वडील, बायको, गाव, फडातील मंडळी, विरोधक या सगळ्या गोष्टींतून त्याचे रंग फिसकटत जातात.
प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जायचे असेल, तर खूप नेटानं जावं; नाहीतर स्वतःचं अस्तित्व गमावून बसवावं लागतं.सर्वस्व गमावलेला गुणा म्हणतो,"ज्या ठिकाणी आपली वस्तू हरवली, ती तिथंच शोधायची असते." गुणा सर्वस्व गमावूनही, तिची साथ मिळाल्यावर खंबीर उभा राहतो, पुढे जात राहतो. आपल्या जीवनात हां प्रसंग प्रेरणादायी आहे.
द्रव्याच्या तीन अवस्थांपैकी मला द्रव अवस्था (liquid state) फार आवडते. कारण, ती ज्या आकाराच्या भांड्यात ओतली जाते, त्याचा आकार ती घेते. अतुलने ती अवस्था या चित्रपटात मिळवली, असे वाटत राहते.
'स्त्री रुप फुलवी नटरंग', 'रसिक हो', या गाण्यांबरोबर 'मला जाऊ द्या ना घरी', 'अप्सरा आली' या ठसकेबाज लावण्या चित्रपटातील प्रेक्षकांप्रमाणे चित्रपटगृहातील प्रेक्षकांकडूनही शिट्या न् टाळ्या कमवतात.
शेवटी मराठी नृत्य प्रकार-लावणी- पिढ्यान् पिढ्या ज्यांनी जपल्या त्यांना मानाचा मुजरा केलाय, तो विनम्र वाटतो.
महाराष्ट्र्-राज्य सरकारचा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट','सर्वोत्कृष्ट अभिनेता' विजेता हा 'नटरंग' रसिकांच्या मनाला एक नवी छटा देऊन जाईल, हे नक्की!
अतुलनीय अतुलला व संगीतकार अजय-अतुल यांना माझा मानाचा मुजरा!
Friday, January 29
Subscribe to:
Posts (Atom)